शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर तालुक्यातील आढे येथील जुन्या गाव परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत ८० लिटर गावठी दारू, १,०५० लिटर रसायन जप्त करण्यात आले असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांच्या ‘सुविधा’ पोर्टलवर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान एकूण तीन वारस गुन्हे दाखल करण्यात आले असून, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ४८ हजार ५०० रुपये इतकी आहे.
धुळे जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीची केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी संबंधित गावांच्या ग्रामसभेत ठराव मंजूर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला पत्राद्वारे सूचना देण्यात आल्याची माहिती विभागाने दिली.
ही कारवाई निरीक्षक डी. पी. नेहूल, दुय्यम निरीक्षक दीपक गवळी, जवान केतन जाधव, दीपक अहिराराव, कल्पेश शेलार तसेच वाहनचालक निलेश मोरे यांच्या पथकाने केली. यावेळी गावाचे पोलीस पाटील राजकिरण राजपूत यांनीही सहकार्य केले.
या धडक कारवाईमुळे गावातील अवैध दारू व्यवसायाला मोठा आळा बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत असून, गावकऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे
