शिरपूर : ग्रामीण भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे दोंडाईचा येथे आयोजित करण्यात आलेल्या टॅलेंट सर्च उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हस्ती पब्लिक स्कूलच्या मैदानावर शनिवारी (दि. १३) झालेल्या निवड चाचणीत ८ ते २५ वर्षे वयोगटातील तब्बल १६१ खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपल्या क्रिकेट कौशल्याचे प्रदर्शन केले.
असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल तसेच सल्लागार व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील सुप्त क्रिकेट प्रतिभेला योग्य प्रशिक्षण व संधी उपलब्ध करून देण्याचा त्यामागील उद्देश आहे. दोंडाईचा शहरात प्रथमच अशा प्रकारचा टॅलेंट सर्च आयोजित करण्यात आल्याने खेळाडू, पालक आणि क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन असोसिएशनचे उपाध्यक्ष विक्रम राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिव प्रितेश पटेल, सहसचिव प्रा. सतीश मराठे, सदस्य राजेश मुनोत, निवड समितीचे सदस्य लहू पाटील, राजेंद्र बारी व महेश चांघले उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार हस्ती वर्ल्ड ऑफ स्कूलचे चेअरमन कैलास जैन यांच्या हस्ते करण्यात आला.
दिवसभर चाललेल्या निवड प्रक्रियेत फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, धावण्याचा वेग, चपळता, फिटनेस आणि मानसिक तयारी अशा विविध निकषांवर खेळाडूंची कसून चाचणी घेण्यात आली. कडक उन्हाची पर्वा न करता युवा क्रिकेटपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमासाठी हस्ती ग्रुपतर्फे भोजन, निवास, वाहतूक आणि मैदानाची व्यवस्था मोफत करण्यात आली. ग्रामीण भागातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल अध्यक्ष भूपेशभाई पटेल व सल्लागार राजवर्धन कदमबांडे यांनी समाधान व्यक्त करत, जिल्ह्यातील क्रिकेटला नवी दिशा देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशन सातत्याने प्रयत्नशील राहील, असा विश्वास व्यक्त केला.
टॅलेंट सर्चचा पुढील टप्पा रविवारी (दि. १४) शिंदखेडा येथील व्ही. के. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये होणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक युवा क्रिकेटपटूंना संधी मिळावी यासाठी हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे.
