
थाळनेर (प्रतिनिधी) : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे नुकतीच ग्रामसभा उत्साहात पार पडली. विद्यार्थी संख्या कमी असल्याने जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण करणे तसेच पाणंद व शेतरस्त्यांची रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली.
लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी निकम यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. तसेच मागील वर्षाचा जमा-खर्च अहवाल सभेपुढे मांडण्यात आला. घरकुल मंजूर लाभार्थ्यांनी लवकर प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ग्रामसभेत गावाच्या कृती आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली. यामध्ये गावातील काँक्रिटीकरण व गटारींची कामे, स्वामी समर्थ मंदिर ते पीक संरक्षण सोसायटीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण आणि गटार बांधकामाचा समावेश करण्यात आला. याशिवाय गॅस एजन्सीची चौकशी करणे, घरांवरील मेन लाईन हटविणे आदी मुद्द्यांवरही चर्चा झाली.
कुंभारटेक येथील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयातील पाण्याची टाकी गायब असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तसेच महसूल मंत्र्यांनी जाहीर केलेल्या पाणंद व शेतरस्त्यांच्या कामांना अद्याप सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
कृषी सहाय्यक सुनील सोनवणे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी, नवनीत वाडीले, सुनील शिरसाठ, डोंगर कोळी, गोपाल पाटील, प्रवीणसिंग राजपूत, महेश जमादार, पत्रकार हेमंत चौधरी, अण्णा शिरसाठ, तलाठी नवनीत पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
