शिरपूर : तालुक्यातील तांडे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, मुंबई संचलित मुकेश आर. पटेल निवासी सीबीएसई स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेली ‘विफा’ इंटर डिस्ट्रिक्ट जुनिअर बॉयज फुटबॉल राज्यस्तरीय स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडली. दि. ११ ते १८ मेदरम्यान झालेल्या या स्पर्धेत राज्यातील ३३ जिल्ह्यांतील संघांचा सहभाग होता. तब्बल ६०० हून अधिक विद्यार्थी खेळाडूंनी मैदान गाजवत क्रीडारसिकांची मने जिंकली.
स्पर्धेतील प्रत्येक सामना चुरशीचा व रोमांचक ठरला. खेळाडूंनी दाखविलेली शिस्त, जिद्द आणि संघभावना यामुळे स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली. अंतिम फेरीत ठाणे जिल्हा संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. मुंबई जिल्हा संघ उपविजेता ठरला, तर पुणे जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघांना ट्रॉफी, पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
समारोप कार्यक्रमास धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव संजय चौधरी, प्राचार्या मंजु सिंह, विफाचे एक्झिक्युटिव्ह मेंबर धनराज मोरे, मॅच कमिशनर राजेंद्र राऊत, सिलेक्टर जावेद खान तसेच एस.व्ही.के.एम. स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ. किरण आंचन उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. किरण आंचन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रात मेहनत, शिस्त आणि सातत्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून योग्य संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, प्राचार्या मंजु सिंह आणि डॉ. किरण आंचन यांनी सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
स्पर्धेतील निवास, भोजन, मैदान व्यवस्थापन व इतर सुविधा एस.व्ही.के.एम. क्रीडा विभागाने सुयोग्य पद्धतीने हाताळल्या. राज्यभरातून आलेल्या संघांनी व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ मिळाले असून शिरपूर परिसराची राज्यस्तरीय क्रीडा आयोजनातील ओळख अधिक दृढ झाली आहे.
