
शिरपूर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या शैक्षणिक अंकेक्षणात आर. सी. पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांनी उल्लेखनीय कामगिरी करत मानाची ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेची पुन्हा एकदा विद्यापीठ स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीतील महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व प्रशासकीय कार्याचे सखोल मूल्यमापन विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात आले. विविध निकषांच्या आधारे करण्यात आलेल्या गुणांकनात महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. यामध्ये निकालाची गुणवत्ता, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता, संशोधन कार्य, व्यावसायिक गुणवत्ता वृद्धी, विविध प्रयोगशाळा, ग्रंथालय, विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, समान संधी केंद्र, ग्रीन ऑडिट, ई-वेस्ट व्यवस्थापन, सोलर प्रकल्प, महिला सक्षमीकरण विभाग आदी घटकांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी टीईटी, सीटीईटी, नेट, सेट, पेट तसेच शिक्षक अभियोग्यता परीक्षांमध्ये मिळवलेले यश, अविष्कार व युवारंग स्पर्धांतील सहभाग, विविध सेमिनार, कार्यशाळा व संशोधन उपक्रम यांचाही अंकेक्षणात विशेष विचार करण्यात आला. तसेच ब्लेंडेड लर्निंग, प्रोजेक्ट-बेस्ड लर्निंग, एलएमएसचा वापर आणि स्वयम व एनपीटीएलद्वारे प्राप्त प्रमाणपत्रांमुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेत भर पडल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
प्राचार्य डॉ. दिपक बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. अंकेक्षण प्रक्रियेसाठी डॉ. तुषार माळी, डॉ. गजानन खेकाडे, जे. एल. चौधरी, डॉ. व्ही. एस. पुराणिक, डॉ. संतोष कोळी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव सौ. रेषा पटेल यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
आमदार अमरिशभाई पटेल,
(अध्यक्ष, शिरपूर एज्युकेशन सोसायटी)
आर. सी. पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, विद्यार्थी विकास, नावीन्यपूर्ण उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि उत्कृष्ट प्रशासकीय कार्य यांचा उत्कृष्ट समन्वय साधत ही उल्लेखनीय उपलब्धी मिळविली आहे. ही ‘अ’ श्रेणी केवळ गौरव नसून भविष्यात अधिक उंच ध्येय गाठण्याची प्रेरणा आहे.

==================
भुपेशभाई पटेल
(कार्याध्यक्ष, शिरपूर एज्युकेशन सोसायटी)
महाविद्यालयाने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात मानाची ‘अ’ श्रेणी प्राप्त करून संस्थेचा नावलौकिक अधिक उंचावला आहे. महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धी, शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधनाभिमुख कार्यपद्धती आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची ही पावती आहे.
