शिरपूर : शहरातील राम कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर इंटरनेट केबल वायरची तपासणी करत असताना विजेचा धक्का लागून फोटोग्राफर व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२४ मे) सायंकाळी घडली. मनिष किशोर भावसार (वय ४९, रा. सुभाष कॉलनी, शिरपूर) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मनिष भावसार हे अजंता फोटो स्टुडिओ तसेच ऑनलाइन सेवा व्यवसाय चालवत होते. याबाबत अमित अशोक भावसार यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजेच्या सुमारास मनिष भावसार हे राम कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर इंटरनेट केबल वायर तपासण्यासाठी गेले होते. यावेळी टेरेसलगत असलेल्या विद्युत तारांचा त्यांना जोरदार शॉक लागला. त्यामुळे ते जागीच बेशुद्ध होऊन पडले.
घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कॉटेज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी रात्री सुमारे ८.४५ वाजता तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
