शिरपूर : शहरातील करवंद नाका परिसरातील सतगुरु हॉस्पिटल मार्केट रस्त्यावर गोवंश जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनावर शिरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत ३ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तुषार प्रभुलाल गोपाळ (वय २७, रा. हाडाखेड, पो. सुळे, ता. शिरपूर) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवंश वाहतूक करणारे वाहन संशयास्पद अवस्थेत असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाने पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना दिली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे एमएच ४१ एयू ०८०५ क्रमांकाची महिंद्रा बोलेरो पिकअप उभी असल्याचे आढळले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सहा गोऱ्हे अत्यंत कमी जागेत कोंबून आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. जनावरांना हालचाल करणे कठीण झाले होते. तसेच त्यांच्यासाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. वाहन चालकाकडे जनावरांच्या वाहतुकीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची विचारणा केली असता तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही.
यानंतर पोलिसांनी पंचनामा करत सुमारे ३ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप व ३६ हजार रुपये किमतीची सहा गोऱ्हे असा एकूण ३ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जनावरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना संत तुकाराम महाराज गोशाळा, वरुळ येथे संगोपनासाठी पाठविण्यात आले.
या प्रकरणी पोकॉ रावसाहेब साळुंखे यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.
