शिरपूर : माजी मंत्री तथा आमदार Amrishbhai Patel आणि आमदार Kashiram Pawara यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शिरपूर तालुक्यातील आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत १४ कोटी ८ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याने संबंधित भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, भारत सरकारकडून यासंदर्भातील अधिकृत मंजुरी आदेश प्राप्त झाले आहेत. या निधीतून अनेक दुर्गम पाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडणारे महत्त्वाचे मार्ग विकसित होणार असून दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम होणार आहे.मंजूर कामांमध्ये खंबाळे येथील जगदिश पाडा रस्त्यासाठी ४ कोटी ४९ लाख १८ हजार रुपये, नागेश्वर ते सोज्यापाडा रस्त्यासाठी ४ कोटी ४२ लाख ९९ हजार रुपये, फत्तेपूर फॉरेस्टमधील ईगन्यापाडा रस्त्यासाठी २ कोटी ३ लाख ६ हजार रुपये, शेमल्या ते हनुमानपाडा रस्त्यासाठी १ कोटी ८८ लाख १५ हजार रुपये तसेच रामपुरापाडा ते धरमपुरा रस्त्यासाठी १ कोटी २५ लाख १४ हजार रुपयांचा समावेश आहे.
या सर्व रस्त्यांमुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांना वर्षभर सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. शिक्षण, आरोग्य, शेतीमालाची वाहतूक आणि दैनंदिन संपर्क यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आमदार अमरिशभाई पटेल आणि आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नांमुळे शिरपूर मतदारसंघातील ग्रामीण व आदिवासी भागातील विकासकामांना गती मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. मंजूर निधीबद्दल तालुक्यातील नागरिकांनी दोन्ही आमदारांचे आभार मानले आहेत.
