
धुळे, (प्रतिनिधी): वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि रस्ते अपघातांतील जीवितहानी कमी व्हावी, यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दुचाकीवरून येणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापर अनिवार्य केला असून, हेल्मेटशिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
“आधी स्वतः नियम पाळा, मग जनतेला सांगण्याचा अधिकार मिळतो,” असा स्पष्ट संदेश देत पोलीस अधीक्षक आनंद यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे पोलीस दलात शिस्तीबरोबरच सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात येत आहे.
वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती केली जाते. मात्र, या मोहिमेला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी पोलीस दलाने स्वतःपासूनच नियमांचे पालन करण्याचा आदर्श ठेवला आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
या नव्या नियमामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना अधिक दृढ होणार असून, सामान्य नागरिकांमध्येही हेल्मेट वापराबाबत सकारात्मक संदेश जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.“हेल्मेट नाही… तर एन्ट्री नाही!” या घोषवाक्यासह धुळे पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाची जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे.
