शिरपूर (प्रतिनिधी) : आंबे–खामखेडा मार्गावर भरधाव दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना १६ मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विकास पावरा यांच्या शेतासमोर घडली.
तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास बलराम सिंगोरिया (वय २६) आणि विवेक सुभाष जमरा (रा. पेंढऱ्या, ता. वरला) हे दोघे एमपी-४६ झेडबी-१७७७ क्रमांकाच्या दुचाकीजवळ रस्त्याच्या कडेला थांबून बोलत होते. त्याचवेळी खामखेडा येथून आंबेकडे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या अपघातात विकास सिंगोरिया यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर विवेक जमरा आणि दुसऱ्या दुचाकीवरील निलेश पावरा हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी बलराम धनसिंह सिंगोरिया (वय ५०, रा. लवाणी, ता. सेंधवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालक गणेश नारायण देशमुख (रा. आंबे) याच्याविरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
