
शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील बभळाज सबस्टेशन अंतर्गत शेतीपंपांना सलग आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सोमवारी १८ मे रोजी बभळाज सबस्टेशनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सकाळी १० वाजता सबस्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले. यानंतर मागण्यांचे निवेदन महावितरणचे उपअभियंता चेतन पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचा कालावधी वाढवून सलग आठ तास वीज देण्याची मागणी करण्यात आली. अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी, अॅड. संतोष पाटील, अॅड. कवरलाल कोळी, अर्जुन कोळी, जितेंद्र करंकाळ, वसंत कोळी, जगन परदेशी, विठ्ठल परदेशी, अनंता परदेशी, अमोल परदेशी यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले. आंदोलनादरम्यान थाळनेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिनेश महाले उपस्थित होते.
