तऱ्हाडी : येथील मुख्य आठवडे बाजार परिसरातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने सायंकाळनंतर संपूर्ण बाजार अंधारात बुडत आहे. त्यामुळे व्यापारी, महिला ग्राहक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आठवडे बाजार हा परिसरातील नागरिकांच्या खरेदी-विक्रीचा प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. मात्र, बाजार भरत असताना पथदिवे बंद असल्याने व्यापाऱ्यांना मोबाईलच्या टॉर्च किंवा मेणबत्त्यांच्या प्रकाशात व्यवसाय करावा लागत आहे. अपुऱ्या प्रकाशामुळे ग्राहकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
अंधारामुळे बाजारात पाकीटमारी, चोरी आणि महिलांची छेडछाड यांसारख्या अनुचित प्रकारांची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे आणि अडथळे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः सायंकाळी खरेदीसाठी येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
या समस्येबाबत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडे अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी केल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासन केवळ आश्वासनांची पूर्तता करत असून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“आम्हाला अक्षरशः अंधारात व्यवसाय करावा लागत आहे. तातडीने पथदिवे सुरू करून बाजार परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा स्थानिक व्यापाऱ्यांनी दिला.
तऱ्हाडीच्या आठवडे बाजारातील अंधाराचे साम्राज्य दूर करण्यासाठी प्रशासन कधी जागे होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
