
शिरपूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे 15 वर्षांखालील मुलींच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 18 ते 28 मेदरम्यान पुणे येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी धुळे जिल्हा संघाची घोषणा करण्यात आली असून, शिरपूरच्या अश्विनी कृष्णा पावरा हिची कर्णधारपदी, तर साक्रीच्या दिव्या नंदू पाटील हिची उपकर्णधारपदी निवड झाली आहे.
संघ निवडीसाठी शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर 13 ते 16 मेदरम्यान निवड चाचणी व सराव शिबिर घेण्यात आले होते. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फिटनेसच्या आधारे खेळाडूंची निवड करण्यात आली.
स्पर्धेतील ‘ड’ गटात धुळे जिल्ह्याचा समावेश असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पुण्यातील सीडीए क्रिकेट क्लब, रिक्रिएशन क्रिकेट क्लब, सीएनए क्रिकेट क्लब आणि क्वालिफायर संघांशी धुळेची लढत होणार आहे. धुळे जिल्हा संघ स्पर्धेसाठी पुण्याकडे रवाना झाला आहे.
संघात अश्विनी कृष्णा पावरा (कर्णधार), दिव्या नंदू पाटील (उपकर्णधार), जिविका दीपक पाटील, पुष्पांजली पंडित पाटील, प्राजंल शरद भामरे, पैंजण रामचंद्र गढरी, यशश्री यशवंत पाटील, अंकिता सद्गुरू शेंडगे, अनन्या निखिल खोपडे, गिरीष्मा गणेश गिरीपुंजे, यशश्री चंद्रकांत पाटील, हर्षिता विश्वनाथ देशमुख, ऋत्वा संदीप पाटील, सारा सागर बेहेरे आणि तनिष्का महेश जाधव यांचा समावेश आहे.
संघाला मुख्य प्रशिक्षक पूजा जैन व सहाय्यक प्रशिक्षक निकिता मोरे मार्गदर्शन करणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंचे धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी अभिनंदन केले.