धुळे : वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांना सतत आवाहन करणाऱ्या पोलीस विभागाने आता स्वतःच्या कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात शुक्रवारी (दि.२२) हेल्मेट व सीट बेल्ट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी विनाहेल्मेट दुचाकी चालविताना ९ पोलीस अंमलदार आढळून आले, तर एका कर्मचाऱ्याने सीट बेल्ट न लावल्याचे निदर्शनास आले. या सर्वांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला. विशेष म्हणजे, नियम मोडणाऱ्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाच समावेश असल्याने विभागाने स्वतःवरही कारवाई करून शिस्तीचा आदर्श ठेवला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून यापुढेही विनाहेल्मेट वाहनचालकांवर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा तसेच चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट बंधनकारकपणे लावावा, असे पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी श्रीराम पवार यांनी केले आहे.
