
शिरपूर : तालुक्यातील आंबे गावातील बोरमळी परिसरात शिरपूर पॅटर्न अंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरण कामांचा शुभारंभ उत्साहात झाला. जलसंधारणाच्या या कामांसाठी सन २०२६-२७ मध्ये २० लाख ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे राबविण्यात येत आहेत. आमदार काशिराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली व भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२७) कामांचा शुभारंभ झाला. यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन आर. आर. माळी, प्रकल्प संचालक टी. आर. दोरीक, सरपंच प्रितम पावरा यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना आमदार पावरा यांनी शिरपूर पॅटर्नमुळे तालुक्यात जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी राहिल्याचे सांगितले. “पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणे” हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, बंधारे, नाला खोलीकरण व रुंदीकरणामुळे भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी अनेक गावांतील विहिरी व बोअरवेल वर्षभर पाण्याने भरलेल्या राहत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रकल्प संचालक टी. आर. दोरीक यांनी सांगितले की, पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत पुनर्भरण करण्यासाठी ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत. यामुळे भविष्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल.
योजनेअंतर्गत आंबे भिलाटपाडा नाला, आंबे बोरमळी नाला तसेच विविध साठवण बंधाऱ्यांसह सात कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर परिसरात तब्बल ४ कोटी ६० लाख लिटर अतिरिक्त पाणी साठा निर्माण होणार असून, सिंचनक्षमता वाढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
