
शिरपूर : ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” उत्साहात २८ मे रोजी आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (धुळे) यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. महाविद्यालय परिसरात पार पडलेल्या या मेळाव्यात केअर हेल्थ धुळे, लेग्रँड जळगाव, डेटामॅटिक्स नाशिक, कॉजेंट ई-सर्व्हिसेस नाशिकसह विविध ३५ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला.
रोजगार मेळाव्यासाठी इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवार सकाळी नऊ वाजल्यापासूनच शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती, बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह मुलाखतीसाठी दाखल झाले होते.

मेळाव्यात एकूण २८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २१८८ विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांशी थेट संवाद साधून पात्र उमेदवारांची प्राथमिक निवड जागेवरच केली. पुढील फेरीसाठी निवड झाल्याचे समजताच अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता.
यावेळी नंदी फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. ग्रामीण व आदिवासी भागातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार मार्गदर्शन आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.
रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. बी. एस. पंचभाई, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर हर्षल बडगुजर, प्रा. प्रशांत टोकशा तसेच समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृता जोशी व डॉ. अनिता जाधव यांनी केले, तर आभार प्रा. बी. एस. पंचभाई यांनी मानले.
