
शिरपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील चोपडा मार्गावरील तरडी गावाजवळ भरधाव सोयाबीन ट्रक पलटी झाल्याची घटना मंगळवारी उशिरा रात्री घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हरियाणा पासिंग असलेला ट्रक सोयाबीन घेऊन दिल्लीकडे जात होता. दरम्यान, शिरपूर-चोपडा रस्त्यावर तरडी गावाजवळ अज्ञात कारणाने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अमोल राजपूत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच थाळनेर पोलीस व महामार्ग पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. माहिती मिळताच पीएसआय भूषण पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व पंचनामा केला.
ट्रक पलटी होण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
