धुळे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुन्हा एकदा ठोस कारवाई करत पिंप्री येथील तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक कैलास रामदास तेले याला २८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई देवपूर परिसरातील जयहिंद चौकात सापळा रचून करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या ठिबक सिंचन संचाच्या तपासणी अहवालाला मंजुरी मिळवून देण्यासाठी तेले याने सुरुवातीला ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील १० हजार रुपये आधीच स्वीकारल्यानंतर उर्वरित रकमेची मागणी कायम ठेवत त्याने तक्रारदारावर दबाव टाकला. यामुळे तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली.
त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचत जयहिंद चौकात कारवाई केली आणि तेले याला २८ हजार रुपये स्वीकारताना पकडले. या घटनेमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल यांच्यासह पथकातील कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांचा सहभाग होता