शिंदखेडा : शहरात गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. अक्षय तृतीया सण तोंडावर असतानाही गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गॅस एजन्सीचे कार्यालय बंद असल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी सुमारे हजारभर ग्राहकांनी भगवा चौकात चक्का जाम आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
शहरात माणिक गॅस एजन्सी, अरुणाई गॅस एजन्सी (एचपी) तसेच भारत गॅस एजन्सीमार्फत गॅस पुरवठा केला जातो. मात्र माणिक गॅस एजन्सीचे स्थानिक कार्यालय मागील आठवडाभर बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कार्यालयाबाहेर “बुकिंग केलेल्यांना घरपोच सिलेंडर मिळेल” असा फलक असला तरी प्रत्यक्षात 10 ते 15 दिवस उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार आहे.
गॅसच्या प्रतीक्षेत ग्रामीण भागातील नागरिक पहाटेपासून रांगा लावत असून एजन्सीसमोर सिलेंडरची मोठी लाईन लागलेली आहे. सणाच्या काळातही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
आंदोलनकर्त्यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, गॅस गाड्या येत असल्या तरी काही हॉटेल व्यावसायिक व ‘व्हीआयपी’ ग्राहकांना प्राधान्य देऊन रस्त्यातूनच सिलेंडर वाटप केले जाते. काही ठिकाणी सिलेंडर 2000 रुपयांपर्यंत विकले जात असल्याचाही आरोप करण्यात आला.
याशिवाय केवायसी प्रक्रियेसाठी 150 ते 200 रुपये आकारून आर्थिक शोषण होत असल्याची तक्रार आहे. मोबाईल नंबर बदललेल्या ग्राहकांचा गैरफायदा घेत अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचेही सांगण्यात आले.