शिरपूर (प्रतिनिधी):
मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दभाशी शिवारात गुरुवारी (दि. 16) दुपारी सुमारे सव्वा चार वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचे आई-वडील जखमी झाले आहेत.मृत मुलाचे नाव सुनील रतिलाल पावरा (वय 7, रा. नांदी, ता. सेंधवा, जि. बडवानी; ह.मु. कलमाडी, ता. शिंदखेडा, जि. धुळे) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हा आपल्या आई-वडिलांसोबत एमएच 18 सीसी 5901 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होता. दभाशी गावाजवळ मागून आलेल्या एमएच 20 बीसी 2664 क्रमांकाच्या एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात सुनील गंभीर जखमी झाला, तर त्याचे वडील रतिलाल रुमालसिंग पावरा (वय 35) व आई वैशाली रतिलाल पावरा (वय 30) हे जखमी झाले. जखमींना तातडीने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी सुनीलला मृत घोषित केले.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास नरडाणा पोलीस करत आहेत.