शिरपूर : धुळे जिल्ह्यातून पुण्याकडे होणाऱ्या वाढत्या प्रवासाची गरज लक्षात घेता, धुळे–पुणे दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा. पी. एस. अंतुर्लीकर यांनी याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री, खासदार डॉ. शोभा बच्छाव तसेच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे.
निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील हजारो नागरिक पुण्यात वास्तव्यास आहेत. याशिवाय अनेक प्रवासी नियमितपणे कामानिमित्त पुण्याकडे ये-जा करतात. मात्र, या दोन शहरांदरम्यान थेट रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावे लागते.
खासगी वाहतूक व्यवस्थेमुळे सणासुदीच्या काळात आणि सुट्यांमध्ये भाडेवाढीचा फटका बसत असून, सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. याउलट, रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, किफायतशीर आणि सोयीस्कर असल्याने ही सेवा सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे अंतुर्लीकर यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळावे यासाठी प्रवासी, विद्यार्थी व व्यापारी यांनी मोठ्या संख्येने रेल्वेमंत्र्यांना पत्रव्यवहार करून दबाव निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. धुळे–पुणे रेल्वेसेवा सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्र आणि पुणे यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.