शिरपूर (प्रतिनिधी) : १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती शिरपूर शहरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी अभिवादन व माल्यार्पणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती च्या आवारात मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील महात्मा फुले व महापुरुषांच्या पुतळ्यांना देखील माल्यार्पण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमास आमदार काशिराम पावरा, प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक, पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, भुपेशभाई पटेल, उपनगराध्यक्ष संगीता देवरे,भाजपचे बबन चौधरी,कृषी मार्केट समितीचे सभापती के. डी. पाटील, शिवसेनेचे राजू टेलर,अरुण धोबी, नगरसेवक गणेश सावळे, राज सिसोदिया, तसेच सामाजिक कार्यकर्ते पिंटू शिरसाठ, माळी, प्रताप सरदार, भालेराव माळी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी,अधिकारी,नगरसेवक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संविधान निर्मितीत दिलेल्या योगदानाबरोबरच सामाजिक न्यायासाठी केलेल्या संघर्षाची आठवण यावेळी उपस्थितांनी केली.
शहरात विविध भागांतून प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.एकूणच, शिरपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहपूर्ण वातावरणात आणि एकात्मतेच्या संदेशासह साजरी करण्यात आली.