शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील पारशीपाडा येथे रविवारी दि.१२ एप्रिल दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. ही आग राजू तुळशिराम पावरा यांच्या लाकडी घराला लागली असून अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण घर जळून खाक झाले.
घर लाकडाचे असल्यामुळे आगीने काही क्षणातच विक्राळ रूप धारण केले. या आगीत लग्नकार्यांसाठी वापरला जाणारा घोडा तसेच एक गाय होरपळून मृत्युमुखी पडले. तर एक म्हैस, एक वासरू आणि आणखी एक गाय गंभीररीत्या भाजली आहे.या घटनेत लाकूड,पीव्हीसी पाईप,ठिबक सिंचन नळी संच यांसह एकूण अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून पंचनामा व शासकीय मदतीबाबत प्रक्रिया सुरू आहे.
आज संबंधित पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी सरपंच दिलीप पावरा तसेच जोयदा येथील सरपंच मनोज पावरा उपस्थित होते.