शिरपूर : गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करत दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी 13 एप्रिल रोजी प्रसार माध्यमांना दिली.सदरची ही कारवाई ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी शिरपूर-शहादा रोडवरील शिगावे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.संशयीतांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सूनावल्याची ही माहिती त्यांनी दिली.
शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचवरून शोध पथकाने शिरपूर शहादा रस्त्यावर शिंगावे शिवारात सापळा लावला असता दोन जणांच्या संशयास्पद हालचाली करताना आढळून आल्याने दुपारी सुमारे २.१० वाजता छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीत त्यांनी आपली नावे पवन दादा कोतवाल वय १९, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे)व अक्षय संदीप पाटील वय २१, रा. भटाणे, ता. शिरपूर, जि. धुळे अशी सांगितली. अंगझडतीदरम्यान पवन कोतवाल याच्याकडून कमरेजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे, तसेच रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. तर अक्षय पाटील याच्याकडून आयफोन १३ कंपनीचा मोबाईल मिळाला.
जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलाची किंमत सुमारे २५ हजार रुपये तर दोन जिवंत काडतुसांची किंमत २ हजार रुपये असून एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. चौकशीत पवन कोतवाल याने हे पिस्तूल अक्षय पाटील याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आरिफ तडवी यांच्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय संदीप दरवडे करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत पीएसआय संदीप दरवडे यांच्यासह डीबी पथकाचे पोहेकॉ रविंद्र आखंडमल, अतुल पाटील, पो.कॉ. आरिफ तडवी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, विनोद आखंडमल, सचिन वाघ, भटू साळुंके, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी तसेच चालक पो.कॉ. रविंद्र महाले व विजय पाटील यांनी सहभाग घेतला