शिरपूर (प्रतिनिधी) :
शिरपूर शहरात गावठी बनावटीचे पिस्टल खरेदी-विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून ही कारवाई शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शनिवारी (११ एप्रिल) दुपारी यशस्वीरीत्या पार पाडली.
मिळालेल्या माहितीनुसार,पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना शिरपूर-शहादा मार्गावरील शिंगावे शिवारात गावठी पिस्टलची खरेदी-विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.
पथकाने शिंगावे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. दुपारी सुमारे सव्वा दोनच्या सुमारास दोन संशयित व्यक्ती पायी येताना पोलिसांना पाहून घाबरल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्टल आणि २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
ताब्यात घेतलेल्या संशयितांनी आपली नावे पवन दादा कोतवाल (वय १९, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) आणि अक्षय संदिप पाटील (वय २१, रा. भटाणे, ता. शिरपूर) अशी सांगितली.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आरीफ तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय संदिप दरवडे करीत आहेत.