शिरपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बाटवापाडा येथे शहीद आदिवासी क्रांतीकारक खाज्या नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी ११ एप्रिल रोजी शौर्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी खाज्या नाईक स्मृतीस्थळाला ‘क’ वर्ग पर्यटन दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
देवगिरी कल्याण आश्रम, आदिवासी प्रकल्प विभाग तसेच ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री उईके यांनी बाटवापाडा येथे बैलगाडीतून खाज्या नाईक यांच्या निवासस्थान असलेल्या गुहेला भेट दिली. यावेळी पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या गजरात त्यांनी नृत्याचा आनंद घेत स्थानिक संस्कृतीला दाद दिली.
कार्यक्रमास आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, अभियंता मोहन सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी अरुण पवार (यावल), संशोधन अधिकारी निलेश राठोड आदी उपस्थित होते.
यापूर्वी शिरपूर येथे मंत्री उईके यांचे आमदार पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, डॉ. रंधे, देवेंद्र पाटील आदींनी स्वागत केले. त्यानंतर शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या शौर्य सोहळ्यामुळे परिसरात देशभक्तीचे आणि आदिवासी परंपरेचे वातावरण निर्माण झाले होते.