शिरपूर : शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी मोठी समस्या ठरत होता. रस्त्यांवर कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणेही धोकादायक वाटत होते. काही ठिकाणी या प्रश्नामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर माध्यमांनी सातत्याने हा प्रश्न लावून धरल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक व प्रशासन एकत्र येत रामसिंग नगर परिसरात मोकाट कुत्र्यांसाठी निर्बिजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.या केंद्रात शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण, लसीकरण व अँटी-रेबीज उपचार केले जाणार आहेत.उपचारानंतर काही दिवसांच्या काळजीनंतर त्यांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडण्यात येईल. त्यामुळे कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाची जबाबदारी जैतोबा शैक्षणिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडे देण्यात आली असून, केंद्रात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपालिकेने सुमारे २० लाख रुपयांचा निधी खर्च करून एबीसी सेंटर, शेल्टर, शस्त्रक्रिया कक्ष, अन्नसाठा कक्ष आणि सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.
दरम्यान, १० एप्रिल रोजी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अतुल बडगुजर यांनी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी संस्थेचे संचालक स्वप्निल साळवे आणि कर्मचारी उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी उचललेल्या या पावलामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.