शिरपूर : तालुक्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, तोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावला गेला आहे. केळी, पपई, आंबा या फळबागांसह गहू, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
आधीच शेतीमालाच्या घसरलेल्या भावामुळे उत्पादन खर्चही निघत नसताना या नैसर्गिक संकटाने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.दरम्यान, शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी समिती नेमण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ही प्रक्रिया कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, सातबारा कोरा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा, राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी यांनी दिला आहे.