शिरपूर : मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील हजारो कुटुंबांची कुलस्वामिनी म्हणून श्रद्धास्थान असलेले श्री बिजासन देवी मंदिर मंगळवारी (ता. ३) चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी साडेसहा ते सायंकाळी पावणेसात या कालावधीत मंदिरातील दर्शन व पूजाविधी पूर्णपणे स्थगित राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली.
मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र–मध्य प्रदेश सीमेवर वसलेले हे मंदिर तीन राज्यांतील भाविकांसाठी प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे हजेरी लावत असतात. विशेषतः चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची संख्या लाखांच्या घरात पोहोचते.
धार्मिक परंपरेनुसार ग्रहणकाळात मंदिरातील नियमित पूजा-अर्चा व दर्शन व्यवस्था बंद ठेवली जाते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून सायंकाळी ६.४५ वाजेपर्यंत मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद राहतील.
या काळात कोणत्याही प्रकारचे दर्शन, नवसपूर्ती किंवा धार्मिक विधी पार पडणार नाहीत.
ग्रहण संपल्यानंतर शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येईल. भाविकांनी दिलेल्या वेळेची नोंद घेऊन गैरसोय टाळावी, तसेच बंद कालावधीत मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.