शिरपूर/धुळे : गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाचे केंद्र ठरलेली स्व. ईश्वरसिंग ग्यानी टी-२० जिल्हा अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा यंदाही दिमाखात पार पडली. धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यंदाचे विजेतेपद चावरा क्रिकेट अकॅडमीने पटकावले.धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत २७ संघ सहभागी झाले होते.अंतिम सामना चावरा क्रिकेट अकॅडमी आणि एसपीसीसी-अ यांच्यात रंगला. नाणेफेक जिंकून एसपीसीसीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चावरा अकॅडमीकडून धिरज सोनवणे याने झुंजार फलंदाजी करत १० चौकार व ७ षटकारांच्या मदतीने १०६ धावांची खणखणीत शतकी खेळी साकारली. स्पर्धेतील हे पहिले शतक ठरले.

सामनावीराचा पुरस्कार शतकवीर धिरज सोनवणे यास प्रदान करण्यात आला. पंच म्हणून कैलास पाटील, विजय अग्रवाल यांनी तर गुणलेखक म्हणून अविनाश गवळी यांनी कामकाज पाहिले.
विजेत्या व उपविजेत्या संघांचा गौरव लवकरच जिल्हा असोसिएशनच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभात रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अत्याधुनिक सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल एसव्हीकेएम शैक्षणिक संस्थेचे मान्यवरांनी विशेष आभार मानले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करून अध्यक्ष भूपेशभाई पटेल व सल्लागार राजवर्धन कदमबांडे यांनी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.