शिरपूर : तालुक्यातील श्री क्षेत्र नागेश्वर बंगला येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री नागेश्वर मंदिर येथे १००८ श्री पार्थिव शिवपूजन सोहळा धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल,आ.काशिराम पावरा तसेच श्री क्षेत्र नागेश्वर संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
शिरपूर–चोपडा मार्गावरील नागेश्वर-अजनाड गावाजवळ सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य मंदिर प्रांगणात सायंकाळी ६ वाजता सामूहिक पार्थिव शिवपूजनास प्रारंभ झाला. सलग तिसऱ्या वर्षी आयोजित या सोहळ्यात १००८ भाविकांनी एकाच वेळी मातीच्या शिवलिंगाची स्थापना करून मंत्रोच्चारात विधिपूर्वक पूजन केले. हजारो शिवभक्तांनी या पुण्यप्रद सोहळ्यात सहभागी होत आध्यात्मिक आनंद अनुभवला. पूजनानंतर साबुदाणा, शिरा व केळीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
यानिमित्त मुंबईच्या ‘द ग्रेट इंडियन क्वायर’ तर्फे भक्तीमय संगीत संध्या रंगली. गायक प्रकाश वाडेकर व त्यांच्या टीमने सादर केलेल्या भक्तिगीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच नादकृष्ण ढोल-ताशा पथक व कृष्णकला डान्स अकॅडमी, शिरपूर यांनी शिवमहिमा सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे काशीच्या धर्तीवर सादर करण्यात आलेली भव्य गंगा महाआरती. दीपमाळा, मंत्रोच्चार आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सादर झालेल्या या आरतीने वातावरण भक्तिमय केले. मध्यरात्री मुख्य मंदिरात महाभिषेक पार पडला.
श्री नागेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे नियोजन यशस्वीरीत्या पार पडले. खानदेशासह परिसरातील हजारो भाविकांनी या दिव्य शिवसोहळ्याचा लाभ घेतला.