शिरपूर : शहरात एकाच रात्रीत दोन मालवाहतूक हायवा डंपर चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे १ कोटी रुपये किमतीचा हा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १० फेब्रुवारी सायंकाळी ६ ते ११ फेब्रुवारी सकाळी ८ दरम्यान घडली.
याप्रकरणी प्रदीप लक्ष्मण चौधरी (वय ५२, व्यवसाय काँट्रक्टर, रा. मिलिंदनगर, शिरपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, शिरपूर–शहादा रस्त्यावरील पटेल सर्व्हिस सेंटर परिसरातून ४७ लाख रुपये किमतीचा एमएच-१८ बीझेड ५११४ क्रमांकाचा हायवा डंपर अज्ञातांनी चोरून नेला. तसेच करवंद नाका येथील एचपी पेट्रोलपंपासमोर लॉक करून उभा केलेला अमन अश्विन कटारिया (वय ३६, रा. मारवाडी गल्ली, शिरपूर) यांचा एमएच-१८ बीएच १७१८ क्रमांकाचा ५३ लाख रुपये किमतीचा हायवा डंपरही चोरट्यांनी लंपास केला.
दोन्ही वाहने लॉक अवस्थेत उभी असताना चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने ती चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. रविंद्र आखडमल करीत आहेत.
शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे वाहनमालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.