शिरपूर : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्यात माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. मार्फत बॉयलर व इतर मशिनरी दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी आमदार काशिराम दादा पावरा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सत्यनारायणाची विधीवत पूजा कारखाना साईटवर 11 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी करण्यात आली असून लगेचच मशनरी दुरुस्ती काम सुरू करण्यात येत आहे. जनरल मॅनेजर गणेश यादव यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली.
यावेळी माँ रेवा कंपनीचे डायरेक्टर अंकित गोयल, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीपभाई पटेल, कारखाना संचालक संग्रामसिंग राजपूत, वासुदेव देवरे, सौ. सुचिता विजय पाटील, माँ रेवा कंपनीचे जनरल मॅनेजर गणेश यादव, अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
माँ रेवा कंपनीचे डायरेक्टर अंकित गोयल यांनी यावेळी शेतकरी बांधवांनी ऊस लागवड करतांना माँ रेवा ऊस बियाणे योजनेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त क्षेत्रावर ऊस लागवड करणेबाबत आवाहन केले.शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या. लि. शिवाजीनगर, दहिवद ता. शिरपूर जि. धुळे हा माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. (म.प्र.) यांना भाडेतत्वावर देण्यात येऊन पुढील वर्षाच्या हंगामात साखर कारखाना सुरु होण्याच्या दृष्टीने कामे सुरु आहेत.
यापूर्वी दि. 10 मे 2024 रोजी सदरचा कारखाना 20 वर्षे कालावधी साठी भाडेतत्वावर देण्यासाठी मे. माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. मध्यप्रदेश यांना शिरपूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक पदाधिकारी यांनी ताब्यात दिला होता. याबाबत त्यावेळी कायदेशीर नोटरी करून देण्यात आली होती. अधिकृतपणे संपूर्ण रजिस्ट्रेशन (नोंदणी) होण्यासाठी शासन स्तरावर अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या सर्व तांत्रिक अडचणी दूर होऊन 30 जानेवारी 2026 रोजी अधिकृतरित्या शासन दरबारी रजिस्ट्रेशन होऊन 2026-27 च्या गळीत हंगामात साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार आहे. गेल्या कालावधीत विविध न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे, साखर कारखान्याची जमीन मोजणी साठी मोठा कालावधी लागणे व विविध तांत्रिक अडचणींमुळे बराच वेळ गेला असून आता अधिकृतरित्या संबंधित माँ रेवा कंपनीला 30 जानेवारी 2026 रोजी नियमाप्रमाणे संपूर्ण स्टॅम्प ड्युटी भरून संबंधित कंपनीसोबत करारनामा पूर्ण करण्यात आला आहे.
शिरपूर शेतकरी साखर कारखाना हा पुढील वर्षाच्या हंगामात सुरु होणार असल्याने शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.