शिरपूर : दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये, यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत जाहीर आवाहन करीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
शिरपूर शहरासह तालुक्यात सध्या इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू असून लवकरच दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे.विद्यार्थी आपले भविष्य घडवण्यासाठी कठोर परिश्रम घेत असताना लग्नसराई, धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका यामधील मोठ्या आवाजातील डी.जे. व लाऊड स्पीकरमुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याचे निदर्शनास आले आहे.


भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) व ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना स्पष्ट केले असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वांनी आदर्श नागरिक म्हणून नियमांचे पालन करावे,असे आवाहन केले आहे.