धुळे/नंदुरबार : विद्युत ठेकेदाराला अदा करण्यात आलेल्या बिलाच्या मोबदल्यात साडेआठ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती आठ लाख रुपये स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत उपविभागाचे उपअभियंता नितीन इंगळे यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (९) सायंकाळी धुळ्यातील सा.बां. विभागाच्या कार्यालयात रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे दोंडाईचा येथील शासकीय विद्युत ठेकेदार असून, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील २८ गावे व पाड्यांमध्ये एलईडी सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम त्यांना मंजूर झाले होते. या कामासाठी जीएसटी वगळता २ कोटी ३७ लाख २९ हजार ३५६ रुपयांची निविदा मंजूर झाली होती. मार्च २०२५ मध्ये ४१ लाखांचे बिल निघाल्यानंतर इंगळे यांनी लाच स्वीकारल्याचे तसेच उर्वरित रक्कम पुढील बिलात देण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये दोन कोटी दोन लाख पाच हजार ५२५ रुपये बिलापोटी खात्यात जमा झाल्यानंतर पुन्हा साडेआठ लाख रुपयांची लाच मागण्यात आली. याप्रकरणी तक्रारदाराने धुळे एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयित इंगळे यांनी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृवात पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेशमा परदेशी, सुधीर मोरे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.