धुळे : मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नगाव परिसरात मंगळवारी (दि. ८) दुपारी बल्क सिमेंट टँकरला अचानक भीषण आग लागली. आगीत टँकर पूर्णतः जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, सिमेंटची वाहतूक करणारा हा टँकर नगाव परिसरात असताना अचानक पेटला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने मोठे लोळ आणि धुराचे लोट उठू लागले. चालकाने प्रसंगावधान राखत टँकर रस्त्याच्या कडेला उभा करून वाहनाबाहेर पडत स्वतःचा जीव वाचविला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस व महामार्ग सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत टँकर संपूर्णतः जळून खाक झाला होता. आगीमुळे महामार्गावर धूर पसरल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव काही काळ दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली. परिणामी वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. आग नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तांत्रिक बिघाड अथवा शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस व अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे.