शिरपूर शहरालगत मांडळ शिवारातील ऋषभनाथ नगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुजित भरतसिंग राजपूत (वय ४१, नोकरी, रा. प्लॉट नं. १७-ए, ऋषभनाथ नगर, मांडळ शिवार, शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.४५ वाजता ते कुटुंबासह दशविधीक्रिया कार्यक्रमासाठी पळासनेर येथे गेले होते. घराच्या वरच्या व खालच्या खोल्यांचे दरवाजे कुलूप लावून बंद केले होते.दरम्यान ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांनी फोन करून घराचे कुलूप व कडी-कोंडा तुटलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर राजपूत कुटुंब सकाळी साडेआठच्या सुमारास घरी आले असता मुख्य दरवाज्याचा कडी-कोंडा तोडलेला आढळून आला.
घरात पाहणी केली असता वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटाच्या लॉकरचे कुलूप फोडलेले असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.कपाटातून सुमारे ६९ हजार ९४० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चांदीचे साहित्य तसेच ४० हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. ५ फेब्रुवारी सायंकाळी ७.४५ ते ६ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून लबाडीच्या इराद्याने घरात प्रवेश करून ही चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोहेकॉ कुंदन पवार करीत आहेत.