शिरपूर (ता. प्रतिनिधी) तालुक्यातील नवी अंतुर्ली येथे गल्लीतल्या अतिक्रमणावरून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी २६ जानेवारी सकाळी ग्रामसभेच्या वेळेस वाद निर्माण झाल्याने मारहाण व शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत दोन्ही गटाकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने एकूण 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद विश्वास ईशी (वय ३३, रा. नवी अंतुर्ली) यांनी गल्लीत झालेल्या अतिक्रमणाबाबत यापूर्वी बीडीओ शिरपूर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.या अर्जाचा राग धरून गल्लीतील रहिवासी भिमराव संतोष ईशी व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्यासह कुटुंबीयांशी वारंवार वाद घातल्याचा आरोप विनोद ईशी यांनी केला आहे. तक्रारीनुसार, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विनोद ईशी हे वडील विश्वास दगा ईशी, चुलत भाऊ योगिराज वेडु ईशी व काका बापू हिरामण ईशी यांच्यासह ग्रामसभेला जात असताना गावातील मंदिराजवळ भिमराव संतोष ईशी व अमीत ईशी यांनी अडवून “अतिक्रमणाबाबतचा अर्ज मागे घे” अशी धमकी दिली.यावेळी अमीत ईशी याने लाकडी काठीने विनोद ईशी यांच्या डाव्या पायावर मारहाण करून गळा पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे.भांडण सोडविण्यासाठी आलेल्या योगिराज ईशी यांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, मंगलबाई भिमराव ईशी व अभिजीत भिमराव ईशी यांनीही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर सरपंच धर्मेंद्र प्रकाश ईशी व ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून भांडण सोडवले.दरम्यान,या घटनेबाबत भिमराव संतोष ईशी यांनीही शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विनोद विश्वास ईशी व त्यांच्या कुटुंबीयांनी घराच्या पाठीमागील गल्लीत कॅम्पाउंड उभारण्यास सुरुवात केली. सदर गल्ली सार्वजनिक रस्ता असल्याचे सांगितल्याचा राग आल्याने विनोद ईशी यांनी काठीने उजव्या हाताच्या दंडावर मारहाण केल्याचा आरोप भिमराव ईशी यांनी केला आहे. तसेच भरत विश्वास ईशी, विश्वास दगा ईशी व पिंटू वेडु ईशी यांनीही शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. ही भांडण जितेंद्र तुकाराम ईशी व मंगेश रावा ईशी यांनी सोडविल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मनोज पाटील करीत आहेत.
अतिक्रमणाच्या वादामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले असून प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.