शिरपूर : तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या काही ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे ग्रामीण भागातील विकासकामे आणि प्रशासकीय कारभार ठप्प झाल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) केला आहे. यासंदर्भात भाकपाच्या शिष्टमंडळाने धुळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक ग्रामसेवक कर्तव्यावर असतानाही कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना साध्या दाखल्यांसह विविध कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. याशिवाय शासकीय निधीचा योग्य विनियोग न करणे, जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी जाणीवपूर्वक रेंगाळवणे, तसेच नियमांना धाब्यावर बसवून मनमानी कारभार करणे, असे प्रकार वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कर्मचारी संघटनांच्या असहकार आंदोलनाचा आडोसा घेऊन प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही भाकपाने केला आहे. याचा फटका ग्रामीण भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.भाकपने दोषी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, ग्रामपंचायतींच्या कामकाजावर कडक नियंत्रण ठेवावे आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळेल अशी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा मागण्या केल्या आहेत. प्रशासनाने तक्रारींची दखल घेऊन तात्काळ पावले उचलली नाहीत, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाकपाने दिला आहे.