शिरपूर /- आधुनिक संशोधन उपकरणांच्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालय, शिरपूर येथे दि. १५ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान तीन दिवसीय वैज्ञानिक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा पी.एम. उषा अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
आधुनिक वैज्ञानिक उपकरणांचा संशोधनातील उपयोग समजावून देणे, तसेच प्रयोगशाळेतील कौशल्यांचा विकास घडवून आणणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. औषधनिर्माणशास्त्र, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजैवशास्त्र, नॅनो टेक्नॉलॉजी व बहुविषयक संशोधन क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांची तत्त्वे, कार्यप्रणाली व प्रत्यक्ष उपयोग याबाबत विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि शिक्षकांना सखोल माहिती दिली जाणार आहे.
या कार्यशाळेत विविध तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार असून त्यामध्ये डॉ. जयंत चंदोरकर (पार्टिकल साईझ विश्लेषण), डॉ. ए. ए. शिरखेडकर (एफ.टी.-आय.आर. स्पेक्ट्रोफोटोमीटर), डॉ. आर. एच. पाटील (इम्युनोडिफ्यूजन), डॉ. संदीप पाटील (प्लांट टिश्यू कल्चर व बायोकंट्रोल), डॉ. एस. आर. लोधा (फ्लुरोसेन्स स्पेक्ट्रोफोटोमीटर व मायक्रोवेव्ह सिंथेसायझर), डॉ. पी. बी. प्रजापती (एच.पी.एल.सी. व यु.व्ही. स्पेक्ट्रोफोटोमीटर), डॉ. एस. बी. बगडे (सोनीकेटर), डॉ. ए. जी. पाटील (अगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस), डॉ. के. आर. पाटील (एक्स्ट्रॅक्शन तंत्रे) तसेच डॉ. एस. एस. चालीकवार (डिसोल्यूशन टेस्ट अप्परेटस) यांचा समावेश आहे.
सैद्धांतिक सत्रांसोबतच प्रत्येकी १० जणांच्या गटांमध्ये विविध विश्लेषणात्मक उपकरणांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार असून सहभागींस उपकरणे स्वतः हाताळण्याची संधी मिळणार आहे. या कार्यशाळेचा लाभ प्राध्यापक व संशोधकांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी केले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक वैज्ञानिक साधनांची ओळख करून देण्यासाठी प्रशिक्षित प्राध्यापक व संशोधक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. गणेश पाटील व डॉ. प्रवीण पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.