क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शहरातील गजबजलेल्या भागात असलेल्या इमारतीत सुरू असलेल्या मेस सदृश्य व्यवसायावर ३० ऑगस्टला दुपारी छापा पडला. काही जणांना ताब्यातही घेण्यात आले. मात्र नंतर त्यांना नोटीस देऊन रवाना करण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण काय होते याची चर्चा रंगली आहे.
सर्विस रोडला खेटून ही इमारत आहे. तिची मालकी एका प्राध्यापकाकडे असल्याचे कळते. त्याने भाडेतत्वावर इमारतीच्या वरच्या मजल्यावरचा गाळा मेस चालवण्यासाठी दिला होता. मात्र तिथे अन्न शिजवण्याऐवजी भलतेच काही शिजवण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली. काही आंबट शौकीन दररोज तिथे हजेरी लावत होते. तासिका तत्वावर हा खेळ सुरू होता. त्यासाठी शेजारच्या तालुक्यातून खास व्यवस्था केली जात होती.
खेळाडूंची संख्या वाढत गेल्याने परिसरात चर्चा सुरू झाली. वरच्या मजल्यावर मेसमध्ये असे कोणते चविष्ट जेवण भेटते की तिथे इतकी गर्दी होते अशी शंका अनेकांना सतावू लागली. त्यातून मग ३० ऑगस्टला दुपारी पोलिसांनी कारवाई केली. तथापि काही कारणास्तव सध्या नोटीसा देऊन संबंधितांना रवाना केले आहे. आता तरी हा खेळ थांबेल का, की मैदान बदलून पुन्हा खेळाडू दंड थोपटतील असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे….