क्राइम ब्लास्ट ब्यूरो
प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्यासाठी आवश्यक असलेला चौकशी अहवाल देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात मंडळ अधिकारी छोटू महादू पाटील याला अँटी करप्शन ब्यूरोने 20 जूनला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने सोंडले (जि.धुळे) शिवारात शेती आहे. सुलवाडे-जामफळ-कनोशी उपसा सिंचन अंतर्गत जामफळ पाया व बुडीत क्षेत्रासाठी सदर शेती संपादित करण्यात आली. तक्रारदाराला शासकीय नोकरीसाठी प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्याची गरज होती. त्यामुळे त्याने पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकार्यांकडे अर्ज केला. त्यांनी तो चौकशीकामी शिंदखेड्याच्या तहसीलदारांकडे पाठवला. तहसीलदारांनी चौकशीची जबाबदारी तामथरे येथील मंडळ अधिकारी छोटू पाटील याच्याकडे सोपवली. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनदेखील छोटू पाटील यांनी चौकशी केली नाही. याबाबत विचारणा केल्यावर त्याने तीन हजार रुपयांची लाच मागितली.
लाच द्यावयाची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अँटी करप्शन ब्यूरोशी संपर्क साधला. तक्रारीची खातरजमा झाल्यावर तक्रारदाराने पुन्हा पाटील याच्याशी संपर्क साधला असता दोन हजारांत तडजोड झाली. त्यानुसार लाचेची रक्कम स्विकारतांना संशयिताला रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे येथील अँटी करप्शन ब्यूरोचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली.