संदीप जमादार
क्राईम ब्लास्ट ब्यूरो
जीएसटी मध्ये करोडो रुपयांचा घोटाळा करून अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ठकाने केलेल्या कारनाम्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात पुन्हा नव्याने तक्रारी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच या ठकाला वाचवण्यासाठी रेशनचा कुख्यात तस्कर पुढे आल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधिकारी आपल्या खिशात असल्याची घमेंड हा तस्कर खुलेआम मिरवीत असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर असे की, शिरपूर शहरातील अनेक व्यापाऱ्यांना जीएसटी भरण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या नटवरलालला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला. त्याला तुरुंगवासही घडला. आता पुन्हा त्याने अनेकांची फसवणूक केल्याची नवी प्रकरणे बाहेर येत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित फसवणूक झालेल्या व्यक्ती शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याच्या प्रयत्नात आहेत. या हालचालींमुळे सावध झालेला नटवरलाल आता कूख्यात रेशन तस्कराच्या पाठीमागे लपण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल होऊ नयेत यासाठी रेशन तस्कर पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवताना दिसून येतो. त्यासोबतच पोलीस स्टेशनच्या परिसरात सर्व अधिकारी आणि हवालदार यांना मी खिशात ठेवतो, माझ्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाची हिंमत नाही अशा बढाया हा रेशन तस्कर मारत असल्याचे दिसून आले. त्यामुळे खरोखर पोलीस त्याच्या दबावात आहेत का अशी शंका उपस्थित केली जात आहे.
व्यापाऱ्यांना करोडोचा चुना लावणाऱ्या नटवरलालचे अनेक किस्से आहेत. त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती केवळ शिरपूरपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राचे अनेक जिल्हे व परराज्यातील धान्य व्यापाऱ्यांनाही त्याने चुना लावला आहे. फसवणूक हेच एकमेव काम करणारा हा नटवरलाल अनेक आर्थिक गुन्ह्यांमध्ये सूत्रधार असून आंतरराज्य गुन्हेगार आहे. त्याची कसून चौकशी झाल्यास आणखी कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरणे बाहेर येतील अशी शक्यता आहे. अधिकाऱ्यांविरोधात अर्ज फाटे करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे उद्योगही नटवरलाल करीत असून त्याचे सज्जड पुरावे क्राईम ब्लास्ट न्यूजकडे आहेत. त्याने स्वतःच्या बचावासाठी आता रेशन तस्कराची ढाल पुढे केली आहे. पोलिसांनी सदर रेशन तस्कराला वेळीच त्याची पायरी दाखवावी अन्यथा शिरपूरच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची बदनामी होईल हे उघड आहे. यापुढे पोलीस अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.