क्राईम ब्लास्ट ब्यूरो
महागड्या स्पोर्ट बाईक चोरून त्यांची काळया बाजारात विक्री करणाऱ्या दोन युवकांना शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 14 लाख रुपये किमतीच्या 12 स्पोर्ट बाईक जप्त केल्या आहेत. संशयिताना शिरपूर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली.
शहरातील विक्रम सिंग राजपुरोहित या युवकाची स्पोर्ट बाईक चोरून नेल्याच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी 11 जूनला संशयित अनिल पावरा व दीपक पावरा यांना अटक केली होती. त्यांना पोलिसांनी इंगा दाखवताच बाईक चोरीची कबुली देऊन वाघाडी, कुवे, शिंगावे आदी ठिकाणाहून एकूण 12 मोटरसायकली काढून दिल्या. त्यांची किंमत 13 लाख 90 हजार रुपये आहे. त्यांच्या अटकेमुळे शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील पाच, तालुका पोलीस ठाण्यातील एक, शहादा पोलीस ठाण्यातील दोन, पानसेमल पोलीस ठाण्यातील एक, जळगाव बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एक असे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयितांकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, डीबी पथकाचे हवालदार राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे भटू साळुंखे, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, विलास कोळी व जितेंद्र अहिरराव यांनी ही कारवाई केली.