संदीप जमादार
क्राइम ब्लास्ट ब्यूरो
पावणेचौदा कोटी रुपयांत मर्चंट बँकेला फसवल्यानंतरही या गुन्ह्यातील संशयित अद्याप मोकाट असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खुद्द डीवायएसपी तपास करीत असतांनाही आरोपी खुलेआम फिरत कायद्याला आव्हान देत असल्यामुळे या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला आहे किंवा नाही याचा जाहीर खुलासा पोलिसांनी करावा अशी मागणी सभासदांमधून केली जात आहे.
मर्चंट बँकेच्या 44 कर्जदारांनी चेअरमन प्रसन्न जैन, मॅनेजर संजय कुलकर्णी, महेश गुजराथी व दिलीप कापडी यांच्याशी संगनमत करुन विनातारणी आयबीपी कर्ज, हायपोथिकेशन कर्ज, कोल्ड स्टोरेज लोन असे कर्ज घेऊन विश्वासघात करीत 13 कोटी 75 लाख 86 हजार 253 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन शहर पोलिस ठाण्यात 48 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 48 जणांची नावे निष्पन्न असून 49 व्या क्रमांकावर कर्ज अधिकारी, अकाऊंटंट, वसुली अधिकारी आदिंची नावे आहेत.
या फिर्यादीत काही मृत कर्जदारांचीही नावे आहेत. बर्याच नावांवर नजर टाकली तर त्यांच्या नावे संचालक, चेअरमन यांनीच कर्ज उचलल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. असे असले तरीही 14 संचालक अद्याप नामानिराळे आहेत. कर्ज देण्यास आणि बेकायदेशीर लाभ उपटण्यात इतरांइतकेच दोषी असूनही त्यांना का वाचवण्यात येत आहे यामागची अर्थपूर्ण कारणे चर्चेत आहेत. मुळात नाव एकाचे आणि कर्ज भलत्यालाच असा खेळ कोणाच्या आशिर्वादाने सुरु होता याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
शहर पोलिसांकडून हा तपास डीवायएसपींकडे गेला. पावणेचौदा कोटींचा गुन्हा असल्यामुळे तो तातडीने आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत करणे आवश्यक होते. मात्र अज्ञात कारणांमुळे अद्याप डीवायएसपी त्याचा तपास करीत असल्याचे कळते. सहकार क्षेत्रातील इतका मोठा गुन्हा असतांना पोलिस त्याविषयी कोणतीच माहिती जाहीर करीत नाहीत. दोनपाच मोटरसायकल पकडल्या तरी आंतरराष्ट्रीय गुन्हा उघडकीस आणल्याचा आव आणणार्या पोलिसांचे मर्चंट बँकेच्या गुन्ह्यातील हे मौन सभासदांच्या मनात संशय उत्पन्न करणारे आहे. एसपी श्रीकांत धिवरे यांच्या ठोस भूमिकेमुळेच हा गुन्हा दाखल होऊ शकला हे सर्वांना ठाऊक आहे. आताही त्यांनीच पुढाकार घ्यावा व गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करुन दूध का दूध और पानी का पानी करावे अशी अपेक्षा आहे. बाहेर मोकाट फिरणारे, सार्वजनिक कार्यक्रमात उजळ माथ्याने सामील होणारे आरोपी अटकपूर्व घेऊन वावरताहेत का याचा जाहीर खुलासा करावा अशी अपेक्षा सभासदांमधून व्यक्त केली जात आहे.