क्राइम ब्लास्ट ब्यूरो
दुकानासमोर स्कूटी उभी केल्याच्या क्षुल्लक वादातून युवकाला बेदम मारहाण करुन लोखंडी फाईटने मारहाण केल्याची घटना 27 ऑक्टोबरला रात्री दहाला शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात घडली. संशयित कमलेश केशव बारी व त्याचा भाऊ (दोघे रा.विद्याविहार कॉलनी, शिरपूर) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅव्हल एजन्सीचा धंदा करणारा कमलेश बारी यापूर्वीही त्याच्या गुंडगिरीमुळे कुप्रसिद्ध असून त्याच्याविरोधात शहर पोलिस कठोर कारवाई करतील का असा प्रश्न स्थानिक रहिवाशांमधून विचारला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, करवंद नाक्यावर सत्यजीत इंद्रसिंह राजपूत (वय 31, रा.व्यंकटेश नगर, मांडळ) हे औषध घेण्यासाठी गेले होते. तेथील चामुंडा मेडिकलसमोर त्यांनी स्कूटी उभी केली. चामुंडा मेडिकलच्या शेजारी असलेल्या शिवस्वराज्य ट्रॅव्हल्सचा संचालक कमलेश बारी याने स्कूटी लावण्यावरुन सत्यजीतशी वाद घातला. हातातील लोखंडी फाईटने सत्यजीतच्या डोक्यावर, नाकावर मारुन रस्त्यावर आपटले. कमलेशच्या लहान भावानेही लोखंडी रॉडने सत्यजीतला मारहाण केली. पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी सत्यजीतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या जबाबावरुन कमलेश बारी व त्याच्य भावाविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मारहाणीच्या घटनेमुळे गजबजलेल्या करवंद नाका परिसरात एकच दहशत पसरली. महिला, मुलींनी घाबरुन पळ काढला. त्यामुळे या गुंडगिरीविरोधात नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून पोलिसांच्या सक्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
कमलेश बारी याच्या गुंडगिरीची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही त्याने अनेकांवर दादागिरी करुन त्रास दिला आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका धार्मिक पर्यटन व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणार्या ज्येष्ठ नागरिकाला व त्याच्या मुलास घरात जाऊन त्याने मारहाण केली होती. शहरात कोणतीही गुंड प्रवृत्ती माजू देणार नाही अशी घोषणा आमदार अमरीशभाई पटेल यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर कॉलनी परिसरातील ही गुंडगिरी पोलिसांनी वेळीच मोडीत काढणे गरजेचे आहे. अशा गुंडांची दहशत त्यांच्या गुंडगिरीच्या क्षेत्रातच पोलिसी मिरवणूक काढून संपुष्टात आणावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करवंद नाका परिसरातून केली जात आहे. यावर पोलिस कोणती भूमिका घेतात, कमलेश बारी व त्याच्या भावावर कठोर कारवाई करतात किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.