क्राईम ब्लास्ट ब्यूरो

संदीप जमादार
मर्चंट बँकेत तत्कालीन अध्यक्ष प्रसन्न जैन यांच्या कार्यकाळात आणि त्यांच्याच सक्रिय भागीदारीतून झालेले असुरक्षित कर्ज वाटप ही आगामी काळात बँकेसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. आज बँकेतून ठेवी काढून घेण्याकडे ठेवीदारांचा वाढता कल बँकेच्या भविष्यासाठी धोकेदायक आहे. गोरगरिबांचा हककाचा आधार असलेली ही बँक आज या स्थितीत आणण्याचे महापाप निःसंशयपणे प्रसन्न जैन यांचेच आहे.
कर्जदार ही अत्यंत गरजू व्यक्ती असते. तिच्या गरजेचा प्रचंड गैफायदा जैन यांनी घेतला. ज्याला पाच लाखाची गरज आहे, त्याला दहा लाख कर्ज घेणे भाग पाडणे, त्यातले पाच लाख मी वापरतो आणि त्याचे हप्तेही भरतो असे तद्दन खोटे आश्वासन द्यायचे अशा कार्यपद्धतीने त्यांनी अनेकांना गंडवले. या रकमा डोळे फिरवून टाकणाऱ्या आहेत. कर्जदार बिचारा, खुद्द चेअरमन सांगतो आहे हे पाहून भरीस पडला. आणि कर्ज झटपट मिळेल हा एक महत्वाचा स्वार्थ त्यामागे असायचाच. एरवी पाच पन्नास हजारांच्या कर्जासाठी सभासदांना फिर फिर फिरविणारे जैन यांचे साथीदार अशा लुबाडू कर्ज प्रकरणांना मात्र तातडीने मंजुरी देत होते.
कर्ज घेतले गेले, पैसा वापरून झाला की कर्ज फेडीचा मुद्दा उपस्थित व्हायचा. त्यासाठी जैन यांची वेगळीच खेळी होती. सुरवातीला कर्जदाराला माझ्या वाट्याचे पैसे मी भरतो..
भरतो असे सांगून टोलवाटोलवी करायची. कर्जदार संतापला की, भांडण उकरून काढत अबोला धरायचा आणि नंतर एक दिवस थेट माझा कर्जाशी काहीच संबंध नाही, कर्ज तुमच्या नावावर आहे, तुम्हीच फेड करा म्हणत मोकळे व्हायचे असा नंगा कारभार जैन यांनी केला.
याहून दुसरी पद्धत तर आणखीच भयंकर होती. तिच्याने पोळलेले अनेक जण आजही जैन यांच्याकडे चकरा मारताना दिसतात. काय होती ही पद्धत आणि कितीजण तिचे बळी ठरले याची माहिती पुढील भागात !