हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

फायरब्रँड अमरीशभाई !

संदीप जमादार

गेली 40 वर्षे अमरीशभाई शिरपूर शहर आणि तालुक्यावर पकड टिकवून आहेत. येथील प्रत्येक महत्त्वाच्या घटना, घडामोडींशी ते प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या संबंधित असतात. त्यांची हजेरी नसेल तर कोणताच सार्वजनिक समारंभ फुलत नाही, बहरत नाही. हॉस्पिटल असो वा हॉटेल, वास्तूचे उद्घाटन भाईंच्या हस्तेच व्हावे असा प्रत्येकाचा हट्ट असतो. त्यासाठी पंचांगातल्या तारखाही बदलल्या तरी चालते ! एका मतदारसंघावर इतका प्रभाव टाकणे आणि तो टिकवून ठेवणे अजिबात सोपे नाही. या आदिवासीबहुल तालुक्यात ते सातत्याने यशस्वीरित्या राजकारण आणि समाजकारण करीत आहेत. जातीचा, नातेसंबंधांचा, राजकारणाचा वारसा नसतांनाही त्यांनी ही किमया करुन दाखवली आहे.

आज तालुक्यातील प्रत्येक घरात त्यांचे नाव निघत नाही, असा एकही दिवस जात नसेल. ही अतिशयोक्ती नाही. भव्यता, उदारता, सकारात्मकता यांचे प्रतिक म्हणून अमरीशभाई ओळखले जातात. ते आता तालुक्यापुरते मर्यादित राहिलेेले नाहीत. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनाही अपॉइंटमेंट न घेता जे थेट भेटू शकतात, अशा निकटवर्ती वर्तुळात भाईंचा समावेश झाला आहे. त्यांच्या कार्याचा झपाटा आणि आवाका इतका विशाल आहे की, त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणवणारे आज कुठेही दिसत नाहीत. अमरीशभाई म्हणजे फायरब्रँड आहेत.

1985 मध्ये शिरपूरच्या नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून अमरीशभाई पटेल समाजसेवेत सक्रीय झाले. तोपर्यंत विकासकामांसाठी पालिकेला शासकीय योजना, कर्जे यांच्यावर विसंबण्याखेरीज पर्याय नव्हता. उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित होते. पैसा नाही म्हणून विकास नाही, विकास नाही म्हणून उत्पन्न नाही अशा दुष्टचक्रात ही संस्था अडकली होती. अमरीशभाईंनी पालिकेला स्वबळावर उभे करण्यासाठी नियोजन केले. पालिकेच्या व्यापारी संकुलांची संख्या वाढवली. व्यापारी गाळे वाढू लागले तशी शहरातील व्यावसायिकांना स्वयंरोजगाराची आणि पालिकेला दरमहा हमखास उत्पन्नाची सोय निर्माण झाली. पाठोपाठ शहरातील रस्त्यांचे जाळे विस्तारले. पेयजलाची सोय अद्ययावत केली. त्यामुळे शहराचा विस्तार वाढला. नव्या वसाहती उभ्या राहिल्या. विकासकर, पाणीपट्टी, मालमत्ता कराच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे साधन उभे राहिले. पाठोपाठ बंधू भूपेशभाई पटेल यांच्या माध्यमातून पालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरिअल रूग्णालयाचे अद्ययावतीकरण करून घेतले. त्यासाठी मुंबई येथील दानशूर उद्योगपती मित्रांची मदत घेतली. हे रूग्णालयही पालिकेसाठी ठोस उत्पन्नाचे साधन झाले आहे. उद्याने, रिक्रीएशन गार्डन, अ‍ॅम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क अशा मनोरंजनपर सुविधांतूनही त्यांनी उत्पन्नवाढीचे मार्ग खुले केले. त्यामुळे शिरपूर पालिका स्वबळावर विकासकामे साकारण्याइतपत सक्षम झाली. आज 24 तास पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, 100 टक्के करवसुलीची परंपरा अशा अनेक वैशिष्ट्यांसह पालिका स्वावलंबी होऊन ताठ मानेने उभी आहे.

1990 मध्ये अमरीशभाई पटेल विधानसभेचे सदस्य म्हणून बहुमताने निवडून गेले. आमदारपदाच्या दीर्घ कार्यकाळात त्यांनी पायाभूत विकासाच्या सुविधा निर्माण केल्या. रस्ते, पूल आदिंद्वारे आदिवासी, ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणला. दळणवळण सुलभ केले. परिणामी दुर्गम भागातील गावेही विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील झाली. तेथील शेतकरी दैनंदिन गरजांसाठी सहजगत्या शहरापर्यंत पोहचू लागला. त्याला शेतीमाल घेवून दररोज विक्रीसाठी शहराच्या बाजारपेठेपर्यंत पोहचणे शक्य झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थी दर्जेदार शिक्षणासाठी शहरात येऊ लागले. पालिकेतर्फे इंदिरा गांधी रुग्णालयाची सुविधा दिल्यानंतर रुग्णांना वेळेत उपचारासाठी दाखल करणे शक्य झाल्याने जिवितहानी नियंत्रणात आली.

बदलती शैक्षणिक परिस्थिती, नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये लक्षात घेवून अमरीशभाई पटेल यांनी शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर.सी.पटेल शैक्षणिक संस्था, श्री विलेपार्ले केळवणी मंडळ आदिंच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणार्‍या प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक, पदविका, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक महाविद्यालयांची उभारणी केली. नियमित शिक्षणक्रमासह रोजगाराभिमुख अभ्यासक्रम देणार्‍या संस्था शिरपुरात आणल्या. मुंबई येथील एनएमआयएमएससारख्या नामवंत विद्यापीठाचे सप्ततारांकित ऑफ कॅम्पस सावळदेसारख्या ग्रामीण भागात उभारले. त्यामुळे महानगरांतील शिक्षण व आदिवासीबहुल शिरपूर तालुक्यातील शिक्षण यातली दरी सांधण्याचे फार मोठे कार्य साध्य झाले. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, कॉस्मेटिक्स आदि शाखांमधील शिक्षण शिरपुरातच उपलब्ध झाल्यामुळे गरजू विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली. त्यांच्या पालकांवरील आर्थिक ताण सुसह्य झाला. शिरपूर सिक्स्टीसारख्या प्रकल्पातून आदिवासी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांसोबत निवासी तत्वावर राहून स्वयंविकास साधण्याची संधी देण्यात आली. ही शैक्षणिक आत्मनिर्भरता शिरपूर तालुक्याचे प्रमुख गुणवैशिष्ट्ये म्हणून ओळखली जात असून खान्देशातील एज्युकेशनल हब अशी नवी ओळख निर्माण करून देणारी ठरली आहे. आगामी काळातील नियोजित कृषी विद्यापीठ, 750 बेडस्चे अतिभव्य हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज विकासाच्या मंदिरावर सुवर्णकळस चढवणारी ठरणार आहेत.

 

आमदारपदाच्या कारकिर्दीत अमरीशभाई पटेल यांनी सिंचनाचे महत्त्व लक्षात घेतले. शेती हाच सर्वकालीन सर्वोत्तम व्यवसाय आहे, नफ्याच्या शेतीसाठी व भविष्याची गुंतवणूक म्हणून पाण्याचे दीर्घकालीन स्त्रोत निर्माण केले पाहिजेत हे त्यांनी लक्षात घेतले. विहिर पुर्नभरणाच्या साध्या प्रयोगातून सुरवात केली. नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, माती भरल्याने बुजलेल्या कॅपिलरीज मोकळ्या करून प्रवाह जिवंत करणे अशा कार्यपद्धतीतून शिरपूर पॅटर्न बंधार्‍यांची मुहूर्तमेढ रोवली. तालुक्यातील लहानमोठ्या नाल्यांमधून वाहून जाणारे पावसाचे पाणी जागोजागी बांध घालून अडवले. कोट्यावधी लिटर पाणी जमिनीत मुरले आणि शिरपूर पॅटर्न बंधार्यांचे दृश्य फायदे सर्वांनाच पहायला मिळाले. एक हजार फुटांहून अधिक खोल गेलेली भूजलपातळी 400 फूटांवर आली. बंद पडलेल्या कूपनलिका जिवंत झाल्या. जेथे विहिरी नव्हत्या, तेथे स्वखर्चाने शेतकर्यांना डिझेल इंजिन्स देवून अमरीशभाईंनी शेती सिंचनाखाली आणली. तालुक्यात एकूण 240 बंधारे पूर्ण झाले असून आणखी 300 बंधार्‍यांचे नियोजन आहे. बंधारे बांधतांना नाल्यातून काढलेला सुपीक गाळ काठावरील पोटखराब क्षेत्रात पसरून ती लागवडीखाली आली. बांधकामादरम्यान तयार केलेल्या रस्त्यांमुळे थेट शेतात पोहचणे शेतकर्यांना शक्य झाले. आता त्यापुढे जाऊन कार्य सुरू आहे. पावसाळ्यातील पाण्याने काठोकाठ भरलेल्या बंधार्यांत मत्स्यबीजे सोडण्यात येत आहेत. नाल्यांकाठी फलोत्पादनासाठी वृक्षारोपण सुरू आहे. आगामी काळात स्थानिक गरजू शेतकर्‍यांना मत्स्यविक्री व फळविक्रीतून शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिरपूर पॅटर्न बंधार्यांमुळे वर्षातून दोन पिके घेणे शक्य झाले. भाजीपाला व केळीसारख्या नगदी पिकांची लागवड वाढली. या फायद्यांसोबत मत्स्योत्पादन व फलोत्पादनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेवून सर्व स्तरातील शेतकर्यांना स्वावलंबी करण्याच्या प्रयोगाचे हे राज्यातील दुर्मिळ उदाहरण ठरावे.

कृषी उत्पादनांवर आधारीत प्रक्रिया उद्योग शेतकरी आणि बेरोजगार अशा दोन्ही घटकांसाठी संजीवनी ठरतात. त्याचे ठळक उदाहरण शिरपूर तालुक्यात दिसून येते. तालुक्यात कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग उभारण्याचे नियोजन अमरीशभाईंनी केले. त्यासाठी सहकारी तत्वावरील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीची निर्मिती त्यांनी केली. पाठोपाठ तांडे येथे टेक्सटाईल पार्कची स्थापना करून उद्योगांना निमंत्रण दिले. आज टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे गरजू महिला कामगारांसाठी या पार्कमधील उद्योगांमध्ये स्वतंत्र जागा असून त्यांना सुरक्षित वाहतुकीची सुविधाही देण्यात आली. या उद्योगात आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पीपीई सूट, एन 95 मास्कसह अनेक ख्यातनाम उत्पादनांची निर्मिती होते. अगदी लॉकडाऊनच्या काळातही येथील उद्योगांनी कामगारांना आधार दिला. सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे तालुक्यातील अर्धकुशल आणि अकुशल युवकांना शाश्वत स्वरूपाच्या रोजगाराची हमी या उद्योगांनी दिली. बेरोजगारी, बकालतेमुळे अनेक भागांमध्ये गुन्हेगारी वाढीस लागल्याची उदाहरणे दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरीशभाईंनी काळाची पावले ओळखून उद्योग क्षेत्राद्वारे शेतकरी आणि युवक अशा दोन्ही घटकांना दिलेला आधार त्यांच्या दूरदृष्टीची चुणूक दाखवणारा आहे.

विकासाचे एक वैशिष्ट्य असते. तो निरंतर सुरु ठेवावा लागतो. अन्यथा साचलेपण आले की त्याचे उलट परिणाम होऊ लागतात. या पार्श्वभूमीवर हवे असतात ते विकासाचा गाडा पुढे नेणारे समर्थ वारस ! माणसांची पारख असलेल्या अमरीशभाईंनी आपले वारसही धोरणीपणाने निवडले त्यापेक्षाही या तालुक्याची सुरक्षितता, विकासाभिमुखता कशी कायम राहील याची काळजीच वाहिली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आमदारपद भूषवतांना अमरीशभाईंनी वारस जोखण्यास सुरवात केली. ज्यांच्या लेखी कुटुंबाची व्याख्या म्हणजे शिरपूर तालुक्याची पाच लाख जनता आहे, त्यांच्यासाठी वारस निवडतांना घेतली जाणारी पूर्वतयारीही अनोखी होती. त्यांनी संधी देऊन माणसे जोखली. ती अत्यंत प्रामाणिक होती जरुर पण तालुका, शहर सांभाळायचे तर अन्य गुणही प्रकर्षाने असावे लागतात. ते अमरीशभाईंच्या लक्षात आले. शिवाय त्यांच्या कामांनी जनमानसावर इतके गारूड केले होते की, पटेल कुटुंबाशिवाय ती जबाबदारी अन्य कोणीच पार पाडू शकणार नाही अशी जनतेची सार्थ खात्री झाली. त्यामुळे नगराध्यक्षपदा साठी अमरीशभाईंनी उद्योगजगतात अत्यंत कौशल्याने वावरणार्‍या भूपेशभाईंना शिरपुरात आणले. जनतेशी असलेली बांधिलकी जपण्यात भूपेशभाई कमालीचे यशस्वी ठरले. सर्व काही योग्य पद्धतीने सुरु असतांना नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय झाला. त्यातही हे पद महिलांसाठी राखीव झाले. त्यामुळे समाजसेवेचा प्रगाढ वारसा लाभलेल्या व कुशल प्रशासक असलेल्या जयश्रीबेन पटेल यांनाही राजकारणात आणण्याशिवाय अमरीशभाईंना पर्याय उरला नाही. आणि त्यांचे हे दोन्ही निर्णय सार्थ ठरल्याचे आज दिसून येते. भूपेशभाई, जयश्रीबेन यांच्या अधिपत्याखाली शिरपूर पालिकेने शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन नेत्रदीपक यश मिळवले. भुयारी गटार योजना, 24 तास पाणीपुरवठा, संपूर्ण काँक्रीटीकरण, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प अशा ठोस विकासकामांना गती मिळून ती पूर्ण झाली. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेचा सुयोग्य वापर करण्याची संधी देऊन अमरीशभाईंनी सिद्ध केले. स्वयंसिद्ध असलेल्या अमरीशभाईंच्या हातून या तालुक्याची आणखी भरभराट होणार आहे. प्रस्तावित कृषी विद्यापीठ, निर्माणाधीन मेडिकल कॅम्पस अशी कर्तृत्वाची कितीतरी क्षितिजे ते सर करण्याच्या मार्गावर आहेत. यामागे अमरीशभाईंच्या शिरपूर तालुक्यावर असलेल्या निस्सीम प्रेमाशिवाय आणखी काहीच नाही. त्यांनी या तालुक्याला जीव लावला आणि तालुक्यानेही त्याची भरभरुन परतफेड केली. हे अनोखे प्रेमच शिरपूरला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारे ठरले आहे. हे प्रेम अबाधित राहो, या तालुक्याचा विकासाचा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासाठी अमरीशभाईंना दीर्घायुरोग्य लाभो हेच आजच्या दिवसाचे प्रभूचरणी साकडे !

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!