क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील करवंद येथे नियोजित अल्पवयीन मुलीचा विवाह शिरपूर पोलिसांनी वेळीच रोखला. वधू आणि वर पक्षाला समजपत्र देऊन रवाना करण्यात आले.
शहरातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीचा करवंद येथे 18 एप्रिलला विवाह होणार असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए.एस.आगरकर यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक पोलिस पाटील यांना घटनास्थळी पाठवले. माहितीची खातरजमा केल्यानंतर महिला कर्मचार्यांसह पोलिस करवंद येथे रवाना झाले.
करवंद येथे लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मंडप टाकला असून जेवण तयार केले जात होते. पोलिसांनी दोन्ही पक्षांना बालविवाह कायद्याने गुन्हा असल्याची समज देऊन मुलामुलीसह पोलिस ठाण्यात आणले. त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. उभयतांच्या आई वडिलांनाही बालविवाह केल्यास त्याचे अनिष्ट परिणाम भोगावे लागतात याबाबत समज देण्यात आली. यापुढे बालविवाह न करण्याबाबत त्यांना समजपत्र देण्यात आले. या घटनेची परिसरात दिवसभर चर्चा होती.