क्राइम ब्लास्ट ब्यूरो
गावठी पिस्तूल आणि काडतूस सोबत घेऊन फिरतांना दोन युवकांना शहर पोलिसांनी अटक केली. दोघेही शिरपूर शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी आहेत.
शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए.एस.आगरकर यांना अवैध पिस्तुलाबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी दहा एप्रिलच्या रात्री साडेअकराला सापळा रचून शिरपूर टोलनाक्याजवळ हॉटेल गॅलक्सीसमोर मोटारसायकलवरील दोन युवकांना संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत देशी पिस्तूल, दोन काडतूसे आढळली.
अरबाज इस्माइल शेख (वय 21) व शाबीर शहा सगीर शहा (वय 19) अशी संशयितांची नावे आहेत. दोघेही अंबिकानगर येथील रहिवासी असून गुन्हा करण्याच्या हेतूने शस्त्र घेऊन फिरत असल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून पिस्तूल व काडतुसांसह मोटारसायकल, मोबाईल असा एकूण 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलि आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पीएसआय किरण बार्हे व सहकार्यांनी ही कारवाई केली.